पालिका अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित
पुणे – करोनाच्या साथीला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार, महापालिकेने सूक्ष्म आराखडा (कन्टेन्मेंट प्लॅन) तयार केला आहे. त्यात प्रतिबंधात्मक उपाय योजनांपासून ते रुग्णाला घरी सोडण्यापर्यंत तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाय योजनांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
हा आराखडा आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून, त्यास मान्यता मिळताच युद्धपातळीवर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. शहरात करोना वेगाने पसरण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. त्याच वेळी या साथीच्या रुग्णांची आणि या आजाराचा फैलाव रोखणे महापालिकेची जबाबदारी असल्याने केंद्रशासनाच्या सूचनेनुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यात परदेशातून नागरिक विमानतळावर आल्यानंतर त्याची तपासणी, परदेशातून आल्यानंतर घरी विलगीकरण झालेल्या मात्र आता संशयित असल्यास अशा व्यक्तींचे विलगीकरण, त्याची करोना तपासणी, त्याला नायडू रुग्णालयात दाखल करून घेणे, त्याचा अहवाल सकारात्मक आल्यास त्याच्यावर उपचार तसेच त्याच्या नातेवाईकांची आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, संबधित परिसरात कोअर झोन (3 किलोमीटर) आणि बफर झोन (5 किमी परिसर) नागरिकांचे सर्वेक्षण करणे, संशयितांचे विलगीकरण करणे, त्या भागात औषध फवारणी, परिसरात संशयितांसाठी आरोग्य सुविधा, रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक मदत, शहरात जनजागृती, आरोग्य सेवा पुरवणे, गर्दी टाळण्यासाठी उपाय अशी कामे निश्चित करण्यात आली असून, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.