अहमदाबाद – संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारे गुजरातच्या सूरतमधील उमेदवार नीलेश कुंभानी यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली. त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले.
कॉंग्रेसने कुंभानी यांना सूरत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, काही विसंगती आढळल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर, इतर ८ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.
साहजिकच, सूरतमधील घडामोडी चर्चेचा विषय बनला. तर, कुंभानी यांच्या भोवती राजकीय संशयाचे धुके निर्माण झाले. त्यांच्या उमेदवारी अर्जावरील स्वाक्षऱ्या आमच्या नसल्याचा दावा ३ सूचकांनी केला. कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यामागील ते प्रमुख कारण ठरले.
तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर कॉंग्रेसने कुंभानी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले. त्यासाठी त्यांना पक्षाच्या गुजरात शाखेच्या शिस्तपालन समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी पक्षाशी असणारा संपर्क तोडला. अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एकतर कुंभानी यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला किंवा त्यांनी भाजपशी समझोता केला असावा, असा निष्कर्ष कॉंग्रेसच्या प्रदेश शाखेने काढला.