पुणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे का?

आयुक्तांनी वस्तुस्थिती मांडावी : माजी आमदार मोहन जोशी

पुणे – तिजोरीत रक्कम नसल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे थांबणार का? या विषयीची वस्तुस्थिती महापालिका प्रशासनाने पुणेकरांसमोर मांडावी, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.

 

“महापालिकेच्या तिजोरीत फारशी रक्कम नसल्याने विकासकामांचा आग्रह धरू नका,’ असे प्रशासन लोकप्रतिनिधींना सांगत आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी योजनांच्या घोषणा करत आहेत. मिळकतकरातून सवलतीसाठी अभय योजना जाहीर केली आहे. आणखीही उत्पन्नवाढीचे दावे पदाधिकारी करीत आहेत. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील विसंगत माहितीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता महापालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळणे गरजेचे झाले आहे, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

भाजपचे नेते उत्पन्नाचे दावे करून मोठ्या योजना मार्गी लावण्याचे दावे म्हणजे दिशाभूल आहे. भाजपने दिखावूपणा कमी करून साथ नियंत्रण आणि मूलभूत सुविधांवरच खर्च करायला हवा, अशी मागणीही जोशी यांनी केली आहे.

 

महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यांत केवळ 40 टक्केच विकासकामे करण्याचा निर्णय घेतला असून त्यातही, अत्यावश्यक सेवा तसेच देखभाल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेस पुढील महिन्याभरात मिळणाऱ्या उत्पन्नावरच विकासकामे अवलंबून असणार असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.