पिंपरी – महापालिका भवनात 31 मार्चपर्यंत प्रवेश बंद केला आहे. तथापि, काही अपवादात्मक परिस्थितीत आवश्यकतेनुसार नागरिकांना मुख्य कार्यालयात येणे आवश्यक असल्यास त्यांना ज्या विभागाशी संबंधित काम आहे त्या विभागप्रमुखांची स्वाक्षरी असलेली लेखी परवानगी किंवा पास असल्यासच विशेष बाब म्हणून प्रवेश दिला जाणार आहे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज काढले.
महापालिका भवनात दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ठेकेदार, ठेकेदारांचे कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. शहरात करोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झालेला असल्याने नागरिकांना महापालिका भवनात 31 मार्चपर्यंत प्रवेश नाकारण्यात आला आहे. मुख्य कार्यालयात येणे आवश्यक असल्यास त्यांना मास्क परिधान करणे आवश्यक असणार आहे.
महापालिका भवनात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छतागृहात जाऊन सॅनिटायझरचा वापर करावा. अथवा साबणाने/हॅण्डवॉशने हात स्वच्छ धुऊन नंतरच कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांच्याकडे जावे. तसेच, कामकाज पूर्ण झाल्यानंतर लगेच कार्यालय सोडण्याबाबत सुरक्षा अधिकारी/कर्मचारी यांनी संबंधितांनी द्याव्या. नागरिक अथवा इतर व्यक्ती जास्त वेळ विभागात रेंगाळणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे. सुरक्षा विभागाने प्रत्येक मजल्यावर 1 रखवालदार कर्मचारी नेमून त्यांच्यामार्फत कार्यवाही करणार.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना
मुख्य कार्यालयाबाहेरील सर्व विभागातील टपाल संबंधित विभागाच्या ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे. मुख्य कार्यालयाबाहेरील कर्मचाऱ्यांनी अनावश्यक कामकाजासाठी मुख्य कार्यालयात येऊ नये. यावयाचे असल्यास विभागप्रमुखांची पूर्वपरवानगी घ्यावी. अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक नसल्यास मुख्यालयात बोलवू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.