पुणे – मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील एका लग्नाच्या वरातीत भांडण झाल्याच्या कारणावरून जीवे ठार मरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात मुख्य आरोपी तुषार विठ्ठल सणस (रा.शिवणे) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी जामीन मंजुर केला आहे.
त्याने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड.ओंकार फडतरे, ॲड. अजिंक्य पोळ यांच्यामार्फ़त जामिनासाठी अर्ज दाख़ल केला होता. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून तीस हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने हा आदेश दिला.
३ सप्टेंबर २०२३ रोजी पौड पोलीस स्टेशन येथे या घटनेची एफआयआर नोंदविण्यात आलेली होती. घोटावडे येथील शेळकेवाडी हॉटेल मैफिल समोर आरोपीने वारातीत झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून ३ तरुणांची गाडी अडवली. त्यांच्यावर कोयत्याने वार करुन लाकडी काठ्या, लोखंडी रॉड यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणात एकूण ८ आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे ,मारहाण करणे, बेकायदा जमाव बनवणे , बेकायदा शस्त्र बाळगणे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सणस याने जामिनासाठी अर्ज केला होता. तो मंजुर झाला.