ठाणे – देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळ राज्यात एकच खळबळ उडाली. आहे. या कारवाईत चक्क एका किराणा दुकानातून तब्बल साडे चार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या घटनेने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्स जप्त केले असून ड्रग्स डीलर दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमागील मास्टरमाईंड मुख्य ड्रग्स डीलर अद्यापही फरार आहे.
दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला खबऱ्याकडून समजली. त्यानंतर कल्याण क्राईम ब्रँचने तत्काळ या किराणा दुकानात धाड टाकत 3 किलो एमडी जप्त केले.
दरम्यान, कल्याण क्राईम पोलिसांनी आरोपी दुकानदार राजेश कुमार प्रेमचंद तिवारी याला बेड्या ठोकले आहेत. तर, मुख्य आरोपी शैलेंद्र राकेश अहिरवार हा फरार झाला आहे.