मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे बंद

चिंचवड देवस्थानचा निर्णय : 31मार्च तसेच पुढील निर्णय येईपर्यंत अंमलबजावणी
करोनाचा फटका
तीर्थक्षेत्रांनाही बसला मंदिरा परिसरातील व्यावसायिकांना बसला जबर फटका
मंदिरांमध्ये पूजा अर्चा नियमित होणार
बारामती (प्रतिनिधी) – चिंचवड देवस्थान अंतर्गत येणाऱ्या अष्टविनायकांपैकी मोरगावचा मयुरेश्‍वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक देवस्थान मंगळवार (दि. 17) पासून 31 मार्चपर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे विश्‍वस्त विनोद पवार यांनी दिली. दरम्यान, या तीनही देवस्थानमध्ये पूजा अर्जा नियमित होणार असून मंदिर व अन्नछत्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

करोनाचे पडसाद अष्टविनायकातील प्रथम असणाऱ्या मोरगाव येथे जाणवू लागले आहेत. मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची संख्या कमालीची रोडावली असून अवघे 400 ते 450 भाविक मयुरेश्‍वराच्या दर्शनासाठी येत होते. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने नगरपरिषद, ग्रामपंचायत व महानगरपालिका या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालय, मॉल आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर गर्दी न करण्याचे आवाहनही केले आहे, त्याचेच पडसाद आता तीर्थक्षेत्र ठिकाणी उमटू लागले असून दर्शनासाठी भाविक येत नव्हते. त्यातच आता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मंदिर परिसरात विविध साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा जबर फटका बसला आहे.

अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे दररोज साधारणतः 15 ते 20 हजार तर सुट्टीच्या दिवशी 40 हजार भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. पहाटेपासूनच “श्रीं’च्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात; मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही गर्दी दिवसेंदिवस घटू लागली होती. तर गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची अत्यंत तुरळक गर्दी जाणवत होती. आता पुढील आदेश येईपर्यंत, मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रांजणगावचे महागणपती मंदिरही बंद
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव मंदिर दर्शनासाठी नेहमीप्रमाणे सोमवारी सुरू होते. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने करून तसे पत्रही देवस्थानकडे दिले होते. दरम्यान, रात्री उशिरा चिंचवड देवस्थान विश्‍वस्तांच्या झालेल्या बैठकीत मंदिर बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टनेही महागणपती मंदिर बंद ठेवण्याबाबत रात्री उशिरा निर्णय जाहीर केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.