Pune Divorce News – तीन वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. परंतु त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. लग्नानंतर दीड वर्षांनी बाळंतपणासाठी गेली ती कायमचीच माहेरी गेली. तेव्हापासून दोघेही विभक्त राहात आहेत. त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीला नोकरीनिमित्त परदेशी जायचे असल्याने घटस्फोटासाठीचा सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करून वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायधीश (वरिष्ठ स्तर) आर.ए शिंदे यांनी एका दिवसात दामपत्याचा घटस्फोट मंजूर केला.
रोहित आणि प्रज्ञा (नावे बदलली आहेत) यांचे लग्न ३० मार्च २०२१ रोजी झाले. लग्नानंतर दोघात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. हळूहळू वाद विकोपाला जाऊ लागले. दरम्यान, प्रज्ञा गरोदर राहिली. बाळंतपणासाठी ती नोव्हेंबर २०२२ ला माहेरी गेली, ती कायमचीच.
दोघांनी व नातेवाईकांनी एकत्र येण्याबाबत प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ ठरले. त्यानंतर प्रज्ञा हिने वकिलांमार्फत घटस्फोटाबाबत नोटीस पाठविली. नोटीस मिळाल्यानंतर रोहितने वकिलांमार्फत प्रज्ञा च्या वकिलांशी संपर्क साधला आणि संमतीने घटस्फोट घेण्यास तयारी दर्शविली.
रोहित आणि प्रज्ञा यांनी अॅड. अमित राठी व अॅड. दाभाडे यांच्या मार्फत वडगाव मावळ पुणे येथील दिवाणी न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता दि. २ मे रोजी अर्ज दाखल केला. दोघे अर्जदार हे नोव्हेंबर २०२२ पासून एकमेकापांसून विभक्त रहात असून, १८ महिन्यांचा विभक्त कालावधी (संमतीने घटस्फोट दाखल पूर्वी बारा महिने विभक्त आणि दाखल केल्यानंतर सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी) पूर्ण झाला आहे. तसेच रोहित यास नोकरी निमित्त परदेशी जायचे आहे.
दोघांची वये पाहता सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करून घटस्फोट मंजूर करण्याबाबत अॅड. राठी यांनी न्यायालयाला विनंती केली. त्यानुसार अर्जदार पती तर्फे अॅड. अमित राठी यांनी काम पहिले. त्यांना अॅड. आदित्य जाधव यांनी सहकार्य केले.
“दोघेही दीड वर्षांपासून वेगळे राहत होते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.” – अॅड. अमित राठी, पतीचे वकील