विधानसभेला भाजपकडून अजित पवार लक्ष्य

राष्ट्रवादीचा वारू रोखण्यासाठी बारामतीत भाजपची व्यूहरचना

जळोची – महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी नजीक आल्याने भाजप शिवसेना व मित्रपक्ष तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्ष आणि राज्यातील इतर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. आगामी विधानसभेची निवडणूक काबीज करून पुन्हा सत्ता संपादित करण्यासाठी भाजप-शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपने बारामतीतून अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाच लक्ष्य करत, मोर्चेबांधणी सुरू असल्याच्या हालचाली केल्या आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला कायापालट आणि मतदार संघात असणारा दांडगा जनसंपर्क या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे पवारांना त्यांच्याच बालेकिल्लात पराभूत करणे सध्या तरी भाजपासाठी मोठं आव्हान असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र या निवडणुकीत पवार रणनितीसमोर भाजपचा निभाव लागू शकला नाही. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला.

दरम्यान 2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांचा आणि 2019ला कांचन कुल यांचा निसटत्या विजयामुळे बारामती जिंकू शकतो. अशी भाजपात आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे भाजपाकडून बारामतीत ताकद लावली जात आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यात उद्या मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार असून, त्यांची सभा होणार आहे. आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेता या महाजनादेश यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here