पुढच्या वर्षी लवकर या…

सातारा – ढोल-ताशांचा गजर, रिमझिम पाऊस आणि गणेशभक्‍तांचा उत्साह, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात सातारा शहर व उपनगरातील 130 गणेशोत्सव मंडळांनी भक्‍तिमय व भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. यंदाची विसर्जन मिरवणूक सुमारे चौदा तास सुरू होती. बुधवार नाक्‍यावरील कृत्रिम विसर्जन तळ्यात मानाच्या शंकर पार्वती गणपतीचे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.

साताऱ्यात चौदा तासांच्या मिरवणुकीने बाप्पांना भावपूर्ण निरोप
सातारा नगरपालिका व पोलीस दलाने मिरवणुकीचे योग्य नियोजन केले होते. पोलीस दलाच्या 650 अधिकारी व जवानांनी सलग छत्तीस तास कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. हायड्रोलिक क्रेनचा तराफा तिरका होणे, तलावाला गळती लागणे आदी समस्यांमुळे सातारा पालिकेने विसर्जनासाठी केलेले ढिसाळ नियोजन चर्चेचा विषय ठरले. मात्र, हे अपवाद वगळता कोणतेही गालबोट न लागता विसर्जन मिरवणूक शांततेत झाली. सर्वच सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. ढोलपथके, बॅंजो, सनईच्या मंगलमय स्वरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

मोती चौकातून दुपारी चार वाजल्यापासून गणेश मंडळांच्या मिरवणुका तांदूळ आळीकडे यायला सुरुवात झाली. मोती चौक-राधिका चौक-बुधवार नाका-बाबर कॉलनी या मिरवणूक मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावले होते. सातारा पालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, नगराध्यक्ष माधवी कदम, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. शिवाजी उदय मंडळ, आझाद हिंद गणेश ही मंडळे सहभागी झाल्यावर विसर्जन मिरवणुकीने वेग घेतला. रात्री साडेदहानंतर मिरवणूक शिस्तीने प्रतापसिंह शेती फार्मच्या जागेतील विसर्जन तळ्याकडे जात होत्या.

रात्री एक वाजेपर्यंत एकतीस तर पहाटे चार वाजेपर्यंत 54 मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. हायड्रॉलिक क्रेनच्या तराफ्यावर श्री मूर्ती उचलून “बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जित करण्यात येत होती. तलावाला गळती लागल्याने पाणी पातळी चौदा फुटांवरून अकरा फुटांवर आली होती. अनेक अडचणींवर मात करत विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली. अनेक मंडळांनी डॉल्बीप्रमाणेच गुलाल उधळण्यासही फाटा दिला होता. अनेकांनी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच टब किंवा बादलीत केले.

पंचमुखी, महागणपती सम्राट, मोती चौकातील प्रतापसिंह, गुरुवार तालीम आदी प्रमुख मंडळांनी ढोल पथकांना सुपारी देत आदर्श घालून दिला. अनेक मंडळांनी नाशिकचा ढोल बाजा, ब्रास बॅंड आदींना निमंत्रण दिले होते. मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांचे व्यवस्थापन व सतर्कता पाहून कार्यकर्ते व गणेशभक्‍तांनी जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांचे कौतुक केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)