पुणे – देशातील व्यावसायिकांनी आत्मनिर्भर व्हावे आणि विदेशीऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा वापर कसा वाढेल, यावर भर देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याला साद देत, अनेक शासकीय विभागांमध्ये स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. याच उपक्रमात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागही (सीडब्लूपीडी) सरसावले असून, विभागातर्फे सर्व प्रादेशिक कार्यालयांना ते वापरत असलेले विदेशी वस्तू आणि त्याला शक्य तो स्थानिक पर्याय याची यादी पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
सीडब्लूपीडीचे संचालक पुनीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विभागातर्फे वापरल्या जाणाऱ्या विदेशी बनावटीच्या वस्तूंची यादी सादर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 500 टन क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेची मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, उच्च क्षमतेचे ऑडिओ-व्हिडिओ उपकरणे, सीसीटीव्ही कॅमेरा, विविध नियंत्रण यंत्रणा (कंट्रोल सिस्टम), फायर सिस्टम अशा विविध वस्तूंचा या यादीमध्ये समावेश आहे. विभागातर्फे या वस्तू इतर देशांमधून आयात केल्या जातात. मात्र, आता या वस्तूंना स्थानिक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.