कात्रज – कात्रज घाटामध्ये मानवी तसेच वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणारा जैव वैद्यकीय कचरा टाकला जात आहे. झाडाझुडपांमध्ये उघड्यावर इंजेक्शन, सुई, रक्त, लघवी यांचे सॅम्पल असलेल्या डब्या, औषधांची बाटली यासह अन्य कचरा टाकण्यात आल्याचे शुक्रवारी वन्यजीव प्रेमी तसेच काही नागरिकांच्या लक्षात आले.
कात्रज घाटातील अर्धा किलोमीटर रस्त्याच्या बाजूने वनविभागाच्या हद्दीत तसेच रस्त्यावर असा कचरा टाकण्यात येत आहे. उशिरा रात्री गाड्यांमधून या ठिकाणी कचरा फेकला जात असल्याचे उघड झाले आहे. हा जैव वैद्यकीय कचरा पुणे शहरातील उपनगरातील रक्त, लघवी तपासणी केंद्रातील असण्याची दाट शक्यता आहे. हा कचरा उघड्यावरच टाकण्यात आल्याने पर्यटकांसह घाटामध्ये माकड, मोर, ससे तसेच डुकरे देखील आहेत. यासह विविध प्रकारचे पक्षी, प्राणी यांच्यासाठीही हा कचरा धोकादायक ठरू शकतो.
कात्रज घाटामध्ये अशाप्रकारे जैव वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर ताबडतोब दंडात्मक कारवाई खटला भरून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले यांनी तक्रार केली आहे. तसेच पक्षी प्रेमी यांनी जैव कचऱ्याविषयीचा व्हिडिओ व्हायरल केला असून यामुळे दक्षिण पुणे उपनगरासह शहरात खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या नियमाकडे दुर्लक्ष…
शहरातील जैव वैद्यकीय कचरा संकलनाबाबत कडक नियम आहेत. शासनाच्या अधिकृत वाहनांद्वारेच शहरभरातील उत्पन्न होणारा जैव वैद्यकीय कचरा वाहतूक केला जातो. याबाबत दवाखाना, लॅबोरेटरीज व इतर आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबतचे रजिस्टर उपलब्ध असते. मात्र, काही नोंदणी नसलेल्या लॅब, रुग्णालयांकडून असा प्रकार होऊ शकतो.
“कात्रज घाटामध्ये टाकण्यात आलेला जैव वैद्यकीय कचरा उचलण्यात आला असून ज्या कोणी दवाखाना अथवा रक्त, लघवी लॅबने हा कचरा टाकला आहे, त्यांचा तपास सुरू असून लवकरच त्यांच्यावर दंड आहे करण्यात येईल.” – राजेश गुर्रम, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय.
“कात्रज घाट वनविभागाच्या हद्दीमध्ये जैव वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांचा तपास करून गुन्हा दाखल करणार आहे. वनविभागाच्या घाट भागातील ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे त्या ठिकाणी अधिक कर्मचारी गस्त घालण्यासाठी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.” – विशाल यादव, वनपाल, खेड शिवापूर वनपरिक्षेत्र