पुणे – लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, त्यानंतर, पुण्यातील प्रचारात भाजपकडून दिग्गज नेत्यांची फौज उतरविली जाणार आहे.
यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे नियोजन भाजपकडून सुरू आहे. या शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही पुण्यात सभा घेण्याबाबत भाजपकडून चाचपणी सुरू आहे.
पुण्यात दि. १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. पुण्यातून ४१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यात, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून मोहोळांसह, बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच मावळ मधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.
महायुतीकडून मोदींच्या उपस्थितीत या सभेत शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. मात्र, या सभेनंतर जवळपास दिड आठवड्याने दि. १३ मे या दिवशी पुण्यात मतदान असल्याने मोदींच्या सभेनंतर निर्माण होणारे वातावरण टिकविण्यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात आले आहे, त्यानुसार, नंतरची प्रचाराची धुरा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे.
शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही नेते मेळावे आणि बैठका घेणार आहेत. योगी आदित्यनाथ यांचा पुण्यात रोड शो होणार आहे. या शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा कार्यकर्ते मेळावे आणि बैठका घेणार आहेत. या शिवाय, भाजपकडून शहरातील प्रत्येक आमदारांवर प्रभागात मेळावे तसेच बैठका घेण्याचे नियोजन देण्यात आले असल्याचे शहराध्यच धीरज घाटे यांनी सांंगितले.