पुणे – महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि बिबवेवाडीतील नवीन कामगार विमा रूग्णालयामुळे शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना ससूनच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि रुग्णांना किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणखी सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही भाजप महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पर्वती विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू, अशी घोषणा काँग्रेसकडून अनेक वर्षे केली गेली. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही, असे सांगत मोहोळ यांनी काँग्रेसवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सुरू करता आले, याचा विशेष आनंद वाटतो.
या महाविद्यालयामुळे वैद्यकीय शाखेच्या करोना काळात शहराच्या आरोग्य यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आला. त्यातच आता बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात १०० बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून १६ एकर जागेतील सात मजली इमारती मधील रूग्णालयाचे काम पूर्ण होत आहे, अत्याधुनिक रूग्णालय पुणेकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. त्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांचाही सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे, भविष्यात आपणही यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, समन्वयक श्रीनाथ भिमाले, दीपक मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, रुपाली धाडवे, वर्षा साठे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रविण चोरबोले, अनुसया चव्हाण, प्रशांत दिवेकर, शिवसेना नेते सुधीर कुरूमकर, नितीन लगस, श्रीकांत पुजारी, अविनाश खेडेकर, राष्ट्रवादीचे संतोष नांगरे, श्वेता होनराव आदी उपस्थित होते.
उद्यानात नागरिकांशी चर्चा…
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करण्यात येत असून त्या माध्यमातून स्थानिक आणि देश-विदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. मोहोळ यांनी पु. ल. देशपांडे उद्यानात सकाळी फिरायला आणि व्यायामाला येणाऱ्या नागरिकांची भेट घेत संवाद साधला.