सुपा -पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर येथील जावायास करोनाची लागण झाली असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. म्हसणे येथील जावई 31 वर्षीय 18 मे रोजी पत्नी, एक वर्षीय मुलासह दाखल झाले. त्यांना शाळेत विलगीकरण करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होवू लागल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याच्या घशातील स्त्रावाचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली.
दरम्यान हे कुटुंब मुंबई येथून म्हसणे येथे एकत्र दाखल झाले असल्याने त्याची पत्नी व मुलगा यांना प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विषेश म्हणजे त्यांना स्वतंत्र कक्षात विलगीकरण करण्यात आले होते. त्यांचा अहवाल दोन दिवसांनी प्राप्त होणार आहे. या दरम्यान संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे.
पारनेरकरांना जावईबापूंचा धोका!
प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने पुणे – मुंबई येथे अडकलेले आपली सासरवाडी गाठत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी जलसेन येथील जावायाचा देखील करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. मात्र त्याची पत्नी व मुलांना करोनाची लागण झाली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले. बाहेर गावावरुन येणाऱ्या व्यक्तींकडून करोनाचा आता ग्रामीण भागातही शिरकाव होत असून ग्रामस्थांनी प्रशासन व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे व आपली स्वतःची काळजी आपणच घ्यावी असे आवाहन करोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.