पुणे – देशातील व्यस्त विमान मार्गामध्ये पुणे-दिल्ली हा मार्ग सहाव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई-दिल्ली ही विमानसेवा मार्ग पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, पुण्याला स्वतंत्र विमानतळ झाल्यावर पुणे-दिल्ली विमानांची संख्या अधिक वाढेल. पर्यायाने व्यस्त मार्गातील क्रमांकही वरच्या पातळीवर येऊ शकतो.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल उभारल्यामुळे आता प्रवासी संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान, सध्याच्या टर्मिनलमधून दिवसाला साधारण १८० ते १९० दरम्यान विमानांची ये-जा होते. त्यामधून दिवसाला साधारण २५ ते २८ हजार प्रवासी प्रवास करतात.
पुणे शहरातून सर्वाधिक विमानांची उड्डाणे ही दिल्लीसाठी होत असल्याचे दिसून आले आहे. दिवसाला साधारण पुण्यातून दिल्लीसाठी २४ विमाने उड्डाण करतात. तर, तेवढीच विमाने पुण्यात येतात. या विमानातून साधारण सात ते आठ हजार प्रवासी पुणे-दिल्ली दरम्यान प्रवास करत आहेत. त्यामुळे पुणे दिल्ली हा देशात सहावा व्यवस्त मार्ग ठरला आहे.
दिल्लीनंतर बंगळुरूसाठी सर्वाधिक उड्डाण…
पुण्यातून दिवसाला देशांतर्गत २५ पेक्षा जास्त शहरांसाठी विमान सेवा पुरविली जाते. तर, दुबई व सिंगापूर या दोन आंतरराष्ट्रीय सेवा सुरू आहेत. पुण्यातून दिल्लीनंतर बंगळुरू शहरासाठी सर्वाधिक १६ विमाने उड्डाण करतात. तर, साधारण तेवढीच विमाने बंगळुरू येथून पुण्यासाठी येतात.
पुणे-हैदराबाद सहा, पुणे-अहमदाबाद चार, जयपूर व चेन्नईसाठी तीन विमाने पुण्यातून उड्डाण करतात. तसेच चंदीगढ, डेहराडून, रांची, पटना, सुरत, भावनगर, मंगळुरू, कोईंम्बतूर, राजकोट, लखनऊ, मोपा, भुवनेश्वर, वाराणसी, गुवाहटी, अमृतसर, कोचीन, नागपूर या भागातही विमानसेवा सुरू आहे.