जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर परिसरात जनावरांची अवैध वाहतूक व विक्री सुरूच आहे. आता जनावरांचे मांस वाहतुकीसाठी पाण्याच्या कॅनचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर पोलिसांनी येथे अनेक ठिकाणी छापे घालून मांस जप्त केले आहे. तसेच जिवंत जनावरांची सुटका केली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाई मध्ये जनावरांना ओढ्याजवळील झुडपात लपवून ठेवले होते. जुन्नर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या या सलग सत्रामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रविवारी (दि.24) गस्तीवरील पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कसाईवाड्यात छापा टाकला. या ठिकाणी काही नागरिकांच्या घरालगतच्या खोलीत प्लॅस्टिक व स्टीलच्या टबमध्ये जनावरांचे मांस आढळून आले. याशिवाय थंड राहण्याऱ्या पाण्याच्या जारमध्येही जनावरांचे मांस विक्री करिता ठेवलेले आढळून आले. याप्रकरणी कादीर कुरेशी, शहरूक बेपारी, शाबीर कुरेशी, बाबू बेपारी (सर्व रा. कसाईवाडा, जुन्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे, मुकुंद पालवे, ज्ञानेश्वर बेंदरे, स्मिता नवघरे, पोलीस कर्मचारी नवनाथ वायाळ, नारायण खंडागळे, बाळासाहेब पवार, राजेंद्र बुरुड, नदीम तडवी आदींनी सहभाग घेतला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेंदरे, पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी करीत आहेत.