संतोष पवार
सातारा – सातारा लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे खा. उदयनराजे भोसले व महाविकास आघाडीचे आ. शशिकांत शिंदे यांच्यात काँटे की टक्कर असून दोघांनाही प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातून उदयनराजे की शशिकांत शिंदे जिंकणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे. दोन्ही बाजूकडून स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका सुरु असल्याने आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्याने वातावरण तंंग बनू लागले आहे.
या मतदारसंघात मागील पंचवार्षिक निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतर तीनच महिन्यांनी त्यांनी राजीनामा देत भाजप प्रवेश केला. पोटनिवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. पहिल्या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत आ. शिंदे यांना उदयनराजेंविरोधात प्रचार करावा लागला होता. विशेष म्हणजे एकेकाळी चांगले मित्र असलेले उदयनराजे व शशिकांत शिंदे या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढली आहे.
खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, संजना जगदाळे, समिंद्रा जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनांचे पदाधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. आ. शिंदे यांच्या प्रचाराला कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा शहर, तालुका, वाई, खंडाळा, कोरेगाव मतदारसंघात शिंदे यांना आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
उदयनराजे भोसले यांच्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले, मनोज घोरपडे, आनंदराव पाटील, विक्रमबाबा पाटणकर, वसंतराव मानकुमरे, विक्रम पावसकर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्याध्यक्ष अमित कदम, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय आहेत. सातारा शहर, तालुका, कोरेगाव व वाई मतदारसंघात उदयनराजेंना प्रचाराला चांगला प्रतिसाद आहे. पाटण तालुक्यात पालकमंत्री देसाई फिल्डवर आहेत. सातारा शहरात त्यांच्या हक्काचे मतदान असले तरी शशिकांत शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून दीपक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान खेचण्याचे नियोजन केले आहे.
उदयनराजेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्यासह दिग्गजांच्या सभा होत आहेत. शशिकांत शिंदे यांच्यासाठी खा. शरद पवार, आ. जयंत पाटील, आदित्य ठाकरे, डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. निवडणूक जवळ येऊ लागली आहे तशी वातावरणातील चुरस वाढू लागली आहे.
महेश शिंदे- शशिकांत शिंदे यांच्यात संघर्ष
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संघर्ष लाेकसभा निवडणुकीत पाहवयास मिळत आहे. आ. महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्यावरुन आरोपाच्या फैरी सुरु ठेवल्या आहेत. शशिकांत शिंदे यांच्याकडून जशास तसे उत्तर देण्यात येत असून लाेकांचे पैसे बुडवून ब्राझिलला पळून कोण गेले, मतदारसंघात टेंडर मॅनेज करुन कोणाच्या घशात घातली जात आहेत असे आरोप होत आहेत. महेश शिंदे व शशिकांत शिंदे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याने निवडणुकीचे वातावरण आणखीनच गरम झाले आहे.
चौकट समोरासमोर घेणे सौभाग्यवती प्रचारात
खा. उदयनराजे भोसले यांच्या सौभाग्यवती दमयंतीराजे भोसले यांनी प्रचारात झोकून दिले आहे. उदयनराजे यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, भविष्यात ते काय करु शकतात याची माहिती दमयंतीराजे मतदारांना देत आहेत. उदयनराजे निष्कलंक असून जनतेतील उमेदवाराला साथ देऊन लाेकसभेत पुन्हा पाठवा, असे आवाहन दमयंतीराजे भोसले यांच्याकडून होताना दिसत आहे.
फोटो – दमयंतीराजे भोसले यांचा वापरावा
महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली शिंदे यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला आहे. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात फिरुन त्या प्रचार करत आहेत. आ. शिंदे यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ जनतेची मनोभावे सेवा केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आ. शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहून त्यांना लाेकसभेत पाठवा, असे आवाहन सौ. शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे.