पिंपरी – करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाला महापौर उषा ढोरे आणि सत्तारुढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी भेट देऊन पाहणी केली. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझर टनेलची सोय केली आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयामध्ये करोना विषाणू संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर रूग्णालयात पुरेशी दक्षता घेतली जात आहे.
रूग्णालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. रुग्णाच्या नातेवाईकांसाठी येथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच, रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझर टनेल उभारण्यात आले आहे.