पुणे – लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भिस्त भाजपच्या ताब्यात असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघावर आहे.
अशातच आता निकालासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी उरलेला असतानाच या लोकसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला विश्वासात का घेतले नाही? तुम्हालाही निवडणूक लढवायची आहे, अशा शब्दांत भाजपच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आमदार भिमराव तापकीर यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली.
आमदार तापकीर यांंनी निवडणुकीच्या श्रमपरिहारासाठी मागील आठवड्यात पदाधिकाऱ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी तापकीर यांना खडे बोल सुनावले आहेत. या बैठकीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून कार्यकर्त्यांची नाराजी पाहता नक्की खडकवासल्यात भाजप कार्यकर्त्यांनी काम केले का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या बैठकीस खडकवासला मतदारसंघातील नगरसेवक तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
आम्हाला दूर ठेवले..
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार तापकीर यांच्याकडून कार्यकर्ते आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांंना कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. आम्ही प्रत्येक वेळी तुमच्यासाठी पळतो. कोणत्याही लाभाच्या पदाची अपेक्षा करीत नाही, मग आम्हाला का गृहीत धरले जाते, असा सवाल एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्याच, वेळी निवडणूक प्रचारासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करीत होते. त्यांना विश्वासात न घेता आमदार म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकत होता.
आमच्या भागात आम्ही निवडणुकांंची तयारी करत असताना सोसायट्यांचे निवडणुकांची कामे आम्हाला विश्वासात न घेताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यांना काहीच माहित नसतानाही त्यांना हे काम का दिले, असा सवालही पदाधिकाऱ्याने केला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तापकीर यांना निसटता विजय मिळाला होता त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी तापकीर यांना परवडणारी नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे.