पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली. या सोडतीसाठी नागरिकांना येत्या 30 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या घरांसाठी आतापर्यंत 40 हजार 779 जणांनी नोंदणी केली असून, 21 हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.
म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास दि.7 मार्च 2024 पासून सुरुवात झाली. या सोडतीमध्ये म्हाडा योजनेअंतर्गत प्र्थम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 2 हजार 416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय योजनेत 59 सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत 978 सदनिका, 20 टक्के योजनेतील पुणे मनपा मध्ये 745 सदनिका आणि 20 टक्के योजनेतील पिंपरी चिंचवडमध्ये 561 सदनिका आहेत.
नागरिकांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केल्याने म्हाडाने एप्रिलमध्ये मुदतवाढ देत 30 मे पर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे. या घरांसाठीची सोडतीपूर्वीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, सोडत तसेच त्यानंतरची ताबा प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकरणाद्वारे ऑनलाइन पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.
येथे करता येणार नोंदणी
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तर प्रथम येणाऱ्यास प्रधम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.