पिंपरी: मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना निगडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी झटका दिला. सुमारे ३५ नागरिकांकडून परेड, सुर्यनमस्कार तसेच यापुढील काळात नियम मोडणार नाही याची शपथ दिली. शनिवारी (दि. १८) सकाळी ही कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला. यामध्ये माजी महापौराचाही समावेश आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना वारंवार केले जात आहे. मात्र काहीजण तरीही या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडतात.
उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी निगडी पोलिसांनी मॉर्निग वॉकसाठी आलेल्या दहा नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही निगडी पोलिसांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ३५ जणांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले.
एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्याकडून परेड सुर्यनमस्कार तसेच यापुढील काळात संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली. निगडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.