अमेठी – उत्तरप्रदेशातील अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी यांनी या मतदार संघातील लोकांसाठी मोठा अन्नधान्य आणि डाळी तसेच तेलाचा पुरवठा केला आहे अशी माहिती जिल्हा कॉंग्रेस तर्फे देण्यात आली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सिंग यांनी सांगितले की राहुल गांधी यांनी पाच ट्रक गहू, पाच ट्रक तांदूळ, एक ट्रक डाळी, खाद्यतेल, मसाले आणि अन्य अन्न सामग्री त्यांनी अमेठीत पाठवली असून त्याचे वाटप मतदारांमध्ये करण्यात आले आहे.
त्यांनी पाठवलेल्या मदत सामग्रीतून 877 ग्राम पंचायत हद्दीतील आणि सात नगर पंचायत हद्दीतील 16 हजार 400 कुटुंबांना या वस्तु पोहोच करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले. या खेरीज राहुल यांनी 50 हजार मास्क, 20 हजार सॅनिटायझर्स, 20 हजार साबण,आणि अन्य स्वच्छतेची सामग्री पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस फाईट्स करोना ग्रुप चालवला जात असून या ग्रुप मार्फत देशाच्या अन्य भागात राहणाऱ्या अमेठीवासियांनाही मदत दिली जात आहे. या ग्रुप मार्फत मध्यप्रदेशातील 91, गुजरात मधील 212, महाराष्ट्रातील 308, पश्चिम बंगालमधील 52, पंजाब आणि हरियानातील 308 कुटुंबांना मदत पाठवण्यात आली आहे.