पुणे : माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद शेट्टी तसेच काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुधीर जानजोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला.
देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या दौऱ्यावर होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या सदानंद शेट्टी आणि सुधीर जानजोत यांचे मुख्यमंत्र्यांनी तसेच प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या वेळी स्वागत केले. खासदार संजयनाना काकडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप कांबळे ,शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल कांबळे या वेळी उपस्थित होते.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक सदानंद शेट्टी लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र गुरुवारी त्यांनी अचानक भाजपात प्रवेश करत कँटोन्मेंट मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिला. सदानंद शेट्टी यांच्या पत्नी आणि बहिणही यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका राहिल्या आहेत. जानजोत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते तसेच शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष होते .शेट्टीं आणि जानजोत यांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांची ताकद वाढली आहे.