शिवेंद्रसिंहराजे; भाजपच्या माध्यमातून मतदारसंघाचे सर्व प्रश्न सोडवणार
सातारा – काही लोकांना आमदार होण्याची स्वप्ने स्वस्थ बसू देत नाहीत. असे लोक निवडणूक आली की जनतेबद्दल खोटा कळवळा दाखवत थापा मारतात. सातारा-जावळी मतदारसंघाचा विकास, हेच माझे ध्येय असून त्याच्या पूर्ततेसाठी मी भाजपमध्यं गेलो आहे. संपूर्ण मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. त्यामुळे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या थापड्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात गुरुवारी अदालत वाडा येथून पदयात्रा काढण्यात आली. शिवाजीराजे भोसले, सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांचे आशीर्वाद घेऊन पदयात्रा सुरू झाली. अदालत वाडा, पै. चौक, वाघाची नळी, देवी चौक, कमानी हौद, कूपर कारखाना, शिंदे गल्ली, घोरपडे वखार, नगरपालिका कार्यालय ते चार भिंती अशी पदयात्रा काढण्यात आली.
पदयात्रेत नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, अमोल मोहिते, जनार्दन जगदाळे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, धनंजय जांभळे, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे, आशा पंडित, यशोधन नारकर, प्रकाश बडेकर, नासीर शेख, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, निमिष शहा, मुख्तार आतार, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
चौका-चौकात नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आणि रांगोळी काढून पदयात्रेचे स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. शिवेंद्रसिंहराजेंनी नागरिकांशी सवांद साधून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, सातारा-जावळी मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरु असून आगामी काळात भाजपच्या माध्यमातून अधिक गतीने विकासकामे मार्गी लावणार आहे. माझी ताकद पाहून विरोधकांना धडकी भरली आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता जनता विरोधकांना घरचा रस्ता दाखवेल.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
उद्या, दि. 11 रोजी सकाळी 7 वाजता मोनार्क हॉटेल चौक, एमजेपी, एस.टी. कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बझार, जगताप हॉस्पिटल, कोल्हाटी वस्ती, मशीद, मारुती मंदिर, माळी आळी, अभयसिंहराजे भोसले कमान, महामार्गाने म्हस्के वाडा, जिजामाता उद्यान, बागडे वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, गोडोली जकात नाका या मार्गावर पदयात्रा निघणार आहे. सायंकाळी 6 वाजता मंगळवार तळे आणि 8 वाजता पंतांचा गोट येथे कोपरा सभा होणार आहेत.