WC 2023 Semi-Final : टीम इंडियाने गुरुवारी (2 नोव्हेंबर) श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह टीम इंडिया 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सामने एकतर्फी झाले. या सामन्यांमध्ये कोणताही संघ भारताला किंचितही आव्हान देताना दिसला नाही. टीम इंडियाच्या या विश्वचषकातील कामगिरीला प्रत्येकजण अप्रतिम म्हणत आहे.
टीम इंडियाच्या या अप्रतिम कामगिरीने चाहत्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हे आश्चर्यकारक आहे कारण याआधी भारतीय संघ कोणत्याही ICC टूर्नामेंटमध्ये अशा स्टाईलने बॅक टू बॅक विजय नोंदवताना दिसला नव्हता. यावेळी संघाकडून अपेक्षा होत्या पण एवढी दमदार कामगिरी करेल असे क्वचितच कुणाला वाटले असेल. हे आपण का म्हणत आहोत? टीम इंडियाची सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची संपूर्ण कहाणी वाचून तुम्हाला याचे कारण समजू शकेल…
पहिला सामना (IND vs AUS ) : विराट आणि केएल राहुलची दमदार कामगिरी…
#CWC2023 #INDvAUS : राहुल-विराटची दमदार अर्धशतके; भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय…
विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी झाला. चेपॉक येथे झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. याचा परिणाम असा झाला की, ऑस्ट्रेलियाला 200 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. प्रत्युत्तरात 200 धावांच्या या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या दोन धावांत तीन विकेट गमावल्या. हे अनपेक्षित होते आणि स्टार्क आणि हेझलवूडचे चेंडू पाहता भारतीय संघ कदाचित 50 चा आकडाही गाठू शकणार नाही असे वाटत होते. येथून विराट कोहली (85) आणि केएल राहुल (97) यांनी उत्कृष्ट खेळी करत टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून सोडवले. अखेर टीम इंडियाने अवघ्या 41.2 षटकांत 6 विकेट्स राखून सामना जिंकला.
दुसरा सामना (IND vs AFG) : कर्णधार रोहितची स्फोटक खेळी…
#CWC23 #INDvAFG : रोहितची विक्रमी शतकी खेळी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय…
दुसऱ्या सामन्यात भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान होते. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 272 धावा केल्या होत्या. सामना अतितटीचा होईल असे वाटत होते पण इथे रोहित शर्माने अशी इनिंग खेळली की पॉवर प्लेमध्येच विजय लिहिला गेला. रोहितने 84 चेंडूत 131 धावांची विक्रमी खेळी केली. त्याला ईशान, विराट आणि श्रेयसने चांगली साथ दिली. भारतीय संघाने येथे 8 गडी राखून विजय मिळवला. मोठी गोष्ट म्हणजे भारताने हा सामना अवघ्या 35 षटकांत संपवला.
तिसरा सामना ( IND vs PAK ) : पाकिस्तानचा केला दारूण पराभव
#CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…
टीम इंडियाचा तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध होता. हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती पण भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावातच विजय निश्चित केला. बुमराहपासून सिराज, हार्दिक, कुलदीप आणि जडेजापर्यंत सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आणि पाकिस्तानचा संघ अवघ्या 191 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 30.3 षटकांतच सहज लक्ष्याचा पाठलाग केला. येथे हिटमॅन रोहित शर्माने पुन्हा एकदा मोठी खेळी (86) खेळली.
चौथा सामना (IND vs BAN ) : बांगलादेश संघाकडून आशिया चषकातील पराभवाचा घेतला बदला…
#CWC2023 #INDvBAN : विराटच्या नाबाद शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार…
बांगलादेशने आशिया चषक 2023 मध्ये टीम इंडियाचा थरारक पराभव केला होता. भारतीय संघाने एका महिन्यानंतर या पराभवाचा जोरदार बदला घेतला. भारतीय संघाने प्रथम बांगलादेशला अवघ्या 256 धावांत आटोपले, त्यानंतर विराट कोहलीच्या (103) शतकाच्या जोरावर त्यांनी लक्ष्य सहज गाठले. भारताने हा सामना 51 चेंडू शिल्लक ठेऊन आणि 7 गडी राखून जिंकला.
पाचवा सामना (IND vs NZ ) : किवी संघही आव्हान देऊ शकला नाही
या विश्वचषकात पहिले चार सामने जिंकणारा न्यूझीलंड संघही भारतासमोर हतबल राहिला. सर्वप्रथम मोहम्मद शमीच्या 5 बळींनी किवी संघाला 273 धावांवर रोखले आणि त्यानंतर विराट (95), रोहित (46) यांच्या खेळीने विजय सोपा केला. दोन षटके बाकी असताना भारताने येथे 4 विकेट्स राखून विजय मिळवला.
सहावा सामना ( IND vs ENG ) : गतविजेत्याचा केला एकतर्फी पराभव
#CWC23 #INDvENG : टीम इंडियाचा विजयी षटकार; इंग्लंडचा 100 धावांनी केला पराभव…
लखनौ येथे झालेल्या सामन्यात इंग्लिश संघाने भारताला केवळ 229 धावांवर रोखले तेव्हा क्षणभर असे वाटले की कदाचित भारताचा विजय रथ आता थांबेल, पण भारतीय गोलंदाजांनी असा भेदक मारा केला की इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 129 धावांवर गारद झाला. येथे मोहम्मद शमीने 4 आणि बुमराहने 3 विकेट घेतल्या आणि भारताने 100 धावांनी विजय मिळवला.
सातवा सामना (IND vs SL ) : श्रीलंकेचा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश
#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …
वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 357 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संघ अवघ्या 55 धावांत ऑलआऊट झाला. येथे शमीने 5 तर सिराजने 3 बळी घेतले. भारतीय संघाने 302 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयाने भारताने उपांत्य फेरी गाठली. हा भारताचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात मोठा विजय आणि विश्वचषक इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.