मुंबई – राज्याचे माजी पोलीस महासंचालक व माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उत्तर-मध्य मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत.
स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी माझी भेट घेऊन मी लोकसभेसाठी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याला मी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
मुंबईतील मतदानाला अवघे २० दिवस उरले असताना सर्व पक्षांनी आता उमेदवार घोषित केले आहेत. या २० दिवसांत २० लाख मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य आहे का? त्यामुळे केवळ पक्षाच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे.
त्याला एक पर्याय म्हणून, स्थानिक उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. माझ्या पाठीशी स्थानिक नागरिक असून ते माझ्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून पर्याय पडताळून पाहत होतो, असे पांडे यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उज्ज्वल निकम, तर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे या मतदार संघात अत्यंत चुरशीची लढात आहे.
त्यात आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहिल्यास मतदार संघातील लढत आणखी वाढणार आहे.