बगदाद – इराकच्या संसदेने शनिवारी समलिंगी संबंधांवर बंदी घालणारा कायदा मंजूर केला. या कायद्याद्वारे समलिंगी विवाह करणाऱ्या जोडप्यांना दंडात्मक शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. अशा जोडप्यांना याकायद्याद्वारे जास्तीत जास्त १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते. समलैंगिकता किंवा वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणालाही किमान सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.
तसेच जो कोणी त्यांचे जैविक लिंग किंवा पोशाख बदलतात त्यांना एक ते तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. या कायद्याला प्रामुख्याने मुस्लिम इराकच्या संसदेत सर्वात मोठी युती बनवणाऱ्या पुराणमतवादी शिया मुस्लिम पक्षांनी पाठिंबा दिला. धार्मिक मूल्यांचे समर्थन करणे आणि इराकी समाजाचे नैतिक भ्रष्टतेपासून संरक्षण करणे हा या कायद्याचा उद्देश आहे.
समलैंगिक समुदायाच्या अधिकारांवर इराकमधील विविध राजकीय पक्षांनी फार पूर्वीपासून टीका केली आहे. सत्तारुढ आणि विरोधी गटांकडून समलैंगिक समुदायाचे ध्वज जाळण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. जवळपास १३० देशांमद्ये समलैंगिक संबंधांना आणि समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात आली आहे. तर ६० पेक्षा अधिक देशांमध्ये समलैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे.