जयपूर – राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने आज 25हून अधिक ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई कथित जलजीवन मिशन घोटाळ्यातील मनी लॉंडरिंग प्रकरणी जयपूर आणि दौसा येथे करण्यात आली. ईडीच्या छाप्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
ईडीचे अधिकारी मनी लॉंडरिंग कायद्यांतर्गत घोटाळ्याशी संबंधित इतर आरोग्य अधिकाऱ्यांचीही चौकशी करत आहेत. यात अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध अग्रवाल यांचाही समावेश आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्येही ईडीने अशीच कारवाई केली होती.
दरम्यान, या छाप्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या देशात आर्थिक गुन्हे होत नाहीत का? एजन्सींनी तिकडे लक्ष द्यावे. ईडीचे लक्ष फक्त राजकारण्यांवर आहे. ईडीला आमचे अध्यक्ष दोतासरा आणि माझ्या मुलाच्या चौकशीतून काहीही सापडले नाही. सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर करणे चुकीचे आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.