#CWC2023 #INDvBAN : विराटच्या नाबाद शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार…

World Cup 2023 India vs Bangladesh Match Result :- एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 41.3 षटकांत तीन गडी गमावून 261 धावा केल्या आणि सामना जिंकला. विराट कोहलीने षटकार लगावत भारताचा विजय साकार केला. तसेच या षटकारासह त्याने वनडे क्रिकेटमधील 48 वे शतकही पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरच्या नावे सर्वाधिक 49 शतकं आहेत आणि या विक्रमापासून कोहली एक शतक मागे आहे.
बांगलादेशच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने 97 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार अन् 4 षटकार लगावले. शुभमन गिलनेही अर्धशतक लगावले. त्याने 55 चेंडूत 5 चौकार अन् 2 षटकारासह 53 धावांची खेळी केली आणि रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. रोहितनं 7 चौकार अन् 2 षटकार लगावले. लोकेश राहुलने 34 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजीत मेहदी हसनने दोन आणि हसन महमूदने एक विकेट घेतली.
For his scintillating unbeaten century in the chase, Virat Kohli receives the Player of the Match award 🏆#TeamIndia continue their winning run in #CWC23 after a 7-wicket win over Bangladesh 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#INDvBAN | #MenInBlue pic.twitter.com/7AypN7QNhK
— BCCI (@BCCI) October 19, 2023
तत्पूर्वी, सलामीवीर फलंदाज लिटन दास आणि टी हसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिद 43 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही 66 धावा करून जडेजाचा बळी ठरला.
ICC Men’s Cricket World Cup 2023
Bangladesh 🆚 India 🏏India need 257 Runs to Win
Photo Credit: ICC/Getty#BCB | #INDvBAN | #CWC23 pic.twitter.com/azjVYJdJ33
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 19, 2023
पहिली विकेट 93 धावांवर गमावलेल्या बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 137 अशी झाली होती. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही 38 धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली.
हार्दिक पांड्याला दुखापत…
या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना त्याच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. यामुळे त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने त्याच्या ओव्हरचे उर्वरित तीन चेंडू टाकले. हार्दिकच्या दुखापतीची तीव्रता समजू शकलेली नाही, मात्र त्याला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेलं असून त्याचे दुसऱ्या डावात फलंदाजीला येणे कठीण दिसत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत स्कॅनिंगनंतरच स्पष्टता येणार आहे. हार्दिक पांड्याची दुखापत भारतासाठी चिंता वाढवणारी आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो पुढे गोलंदाजी करू शकला नाही.
दरम्यान, भारताचा पुढील सामना न्यूझीलंडशी आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत आणि ते एकमेव संघ आहेत जे आतापर्यंत अपराजित आहेत. अशा परिस्थितीत 22 ऑक्टोबरला होणारा हा सामना खूपच रोमांचक असेल.





