मुंबई – शरद पवार यांच्या मनाविरूद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत 2 जुलैला सरकारमध्ये सामील झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये काही नेते शरद पवार यांच्या तर काही अजित पवार यांच्या गटात विभागले गेले.
यावेळी 2 जुलैला पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे बोलले गेले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपली भूमिका मांडली आणि ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता त्यांनी भूमिका बदलली असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या एका वक्तव्याने खा. कोल्हे अजित पवार गटात असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप यावर खा. कोल्हे यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
राष्ट्रवादीतील दोन्ही गटात सुरु असलेल्या वादादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिले आहे, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहिती तटकरेंनी यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खा. सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पीटीशन दाखल केले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिले आहे. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. त्यामुळे ते आमच्या सोबत आहेत असे आम्ही मानतो, असे तटकरे म्हणाले आहेत.
राज्यभर दौरा करणार – तटकरे
पुढे बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले की, 2 जुलैला आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नागालँड, झारखंड येथील आमदारांनी देखील समर्थन दिले आहे. आम्ही राज्यभर दौरा सुरू करत आहोत. पहिला दौरा विदर्भातून असेल. त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल. राज्यातील जनता अजित पवार यानी घेतलेल्या निर्णयासोबत आहे.
सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करा – सुप्रिया सुळेंची मागणी
खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली.
3 जुलैला अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली होती भूमिका –
अमोल कोल्हे यांनी 3 जुलैला आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना म्हटले होते की, ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुन। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है…पर दिल कभी नहीं,’ असं म्हणत मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले होते. तसेच अमोल कोल्हे यांनी यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील एक बोलका व्हिडिओही ट्वीट केला आहे. ‘सगळं विसरायचं, पण बापाला नाही विसरायचं. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने कणसाळतो, कुंभारतो. त्याला नाही विसरायचं,’ असं अमोल कोल्हे या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023