सांगली -कवठेमहांकाळ तालुक्यातील निमज येथे चोरीचे वीजकनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या रमेश आनंदा दगडे (वय 41, रा. कदमवाडी, ता. कवठेमहांकाळ) या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी व दगडाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वायरमनचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी नितीन गोपाळ आमुणे (वय 28) व गोपाळ कृष्णा आमुणे या संशयितांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
रमेश दगडे ढालगाव येथील वीजवितरण कंपनीच्या शाखा कार्यालयात कंत्राटी कर्मचारी (बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ) म्हणून कार्यरत आहेत. निमज येथील दुधेभावी रस्त्यालगत विजेचे दोन ट्रान्सफार्मर आहेत. त्यापैकी एक खराब झाल्याने ग्रामस्थांनी दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवरून आकडा टाकून वीज घेतली होती. वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांनी त्याला परवानगी दिली होती. पण ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्याने सहाय्यक अभियंता विवेक वायफळे यांनी दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरमधील कनेक्शन बंद करण्यासाठी रमेश दगडे व दशरथ केंगार या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी निमजला पाठवले होते. ते कनेक्शन बंद करून परत येत असताना नितीन आमुणे व गोपाळ आमुणे यांनी वीज कनेक्शन तोडल्याच्या रागाने दगडे यांना जबर मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा शुक्रवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.