पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या वर्षापासून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीच्या शैक्षणिक वर्षीपासून केले जाणार आहे. परंतु सध्याची करोनाची परिस्थिती पाहता महाविद्यालयाच्या शुल्कवाढीवर फेरविचार होणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे.
2016 च्या सुधारित महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने त्यांचा अहवाल कुलगुरू डॉ. करमळकर यांना सादर केला. हा अहवाल स्वीकारून विद्यापीठाने शुल्कनिश्चिती केली आहे. सन 2020-21 पासून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्कात 15 ते 20 टक्क्यांनी अभ्यासक्रमानुसार शुल्कवाढ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने करोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही शाळेने शुल्कवाढ न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळांना नियमानुसार शुल्कवाढ करणे शक्य असतानाही त्यांना शुल्कवाढ करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय शुल्कवाढ करणे यंदा संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे यासंदर्भात फेरविचार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निर्णयाकडे हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष
विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या शुल्कात मोठी वाढ केली होती. यामध्ये विशेषतः विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी ही वाढ केली गेली आहे, असे दिसून येते. दरम्यान, 2011-12 मध्ये शैक्षणिक शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी विद्यापीठाने हा निर्णय घेतला होता. मात्र, यंदा शुल्कवाढीला स्थगिती मिळण्याची चिन्हे आहेत. यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.