कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे स्पष्ट संकेत
पुणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतूनच लढणार असल्याचे संकेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी कॉंग्रेसभवन मध्ये आयोजित अनौपचारीक चर्चेदरम्यान दिले.
यावेळी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाअध्यक्ष आमदार संजय जगताप, मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाजेड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर उत्तमपणे वाटचाल करत असून, सत्ता गेल्यामुळे भाजपला “ग’ ची बाधा झाली आहे. त्यामुळेच आघाडी सरकार कोसळणार, असे ते सातत्याने पसरवत आहे. हे पराभूत मानसिकतेचे लक्षण असल्याचा टोमणाही थोरात यांनी यावेळी मारला. आगामी निवडणुका महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्रित येऊन लढणार असल्याचे सांगतानाच थोरात यांनी नुकत्याच सहा ठिकाणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी एकत्रीत लढल्याने सत्तासमीकरण बदलल्याचेही सांगितले.