बुलढाणा – बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतदान प्रक्रिया 26 एप्रिल रोजी पार पडली. मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला असून त्याचा अंतिम फैसला आता 4 जूनलाच होणार आहे.
त्यामुळे अनेक उमेदवारांसह मतदारांनाही या निकालाची उत्सुकता लागली आहे. असे असताना मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदन रविकांत तुपकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे.