नगर – महाशिवरात्रीनिमित्त शहर व परिसरातील शिवालये भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. बुऱ्हानगर रोडवरील बेल्हेश्वर मंदिर, सिध्दीबागेतील सिध्देश्वर मंदिर, माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिर, ओंकारेश्वर,अमृतेश्वर, स्टेट बॅंकेसमोरील विजय शंकर मंदिर, भिंगार येथील शुक्लेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच शिवालयात भाविकांनी गर्दी केली होती. शिवलिंगाचा अभिषेक, पूजाअर्चा केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुले करण्यात आली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध संस्था, ट्रस्ट यांच्यावतीने फ ळे, फ राळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परीसरात हार,फु ले,बेल विक्री करणारी दुकाने थाटली होती.
अनेक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रवचन, किर्तन, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम व बम बम भोलेच्या गजराने मंदिर परीसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.दरम्यान, नगर येथील हरियाली संस्थेच्या वतिने आज भिंगार मधील प्रसिध्द बेलेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रि निमित्त भाविकांना बेल वृक्षाचे रोपे प्रसाद म्हणून देण्यात आली.
या वेळी वृक्षाबाबत माहीती देताना सुरेश खामकर यांनी सांगितले की महादेवाच्या पुजेसाठी बेलाचे फळ आणि पाने वाहीली जातात.त्यामुळे बेल वृक्षास धार्मिक दृष्ट्या महत्व आहेच.शिवाय हा वृक्ष दुर्मिळ प्रजातीत येत असून औषधी आहे.या वृक्षाच्या पानाचे अंकुर उष्ण असतात. मूळ कफपित्तनाशक, पानाचे अंकुर व फळ पित्तवर्धक आहे. जुलाब वांती, तहान, ताप,क्षय व सर्वसाधारण दौर्बल्यात वापरतात,डांग्या खोकल्यात याची गाठ उगाळुन चाटवितात.तसेच लाकडांचा उपयोग लगद्यासाठी व पेपर तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.
परंतु या वृक्षाचे प्रमाण खुपच अत्यल्प असुन या वृक्षांची लागवड होवुन त्याचे संवर्धन होणे महत्वाचे असल्याचे खामकर यांनी सांगितले.
या वृक्षाची लागवड करुन संगोपन करतील अशा इच्छुक भाविकांना संस्थेने बेल वृक्षांचे रोपे विनामुल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता जेणेकरुन दुर्मिळ, धार्मिक व औषधी महत्व असलेल्या या वृक्षांची संख्या वाढण्यास मदत होईल.या उपक्रमास नागरीकांनी दिलेला प्रतिसाद पाहुन दरवर्षी 300 रोपे महाशिवरात्रिस नागरीकांनां विनामुल्य देण्याचा हरियाली संस्थेचा मानस आहे. यावेळी हरियालीचे सुरेश खामकर,मनपा वृक्षाधिकारी उध्दव म्हसे, प्रा.सतिष शिर्के, रंगनाथ सुंबे, संदीप पावसे,रमेश घुले यांच्यासह भाविक उपस्थित होते.