वरवंड – पाटस (ता. दौंड) येथे श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ पाटस यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटस गावात रथातून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत छत्रपतींच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.
शिवजयंती निमित्त मंगळवारी (दि. 18) सकाळी शिवशंभू प्रतिष्ठान आणि आधार ब्लड बॅंक पुणे यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 88 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. शिवजयंतीला (दि. 19) सकाळी पाटस येथील तरुणांनी कुरकुंभ येथील फिरंगाई माता मंदिर येथून पायी ज्योत आणली.
यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याचे आणि ध्वज पूजन करण्यात आले. दिवसभर भजन घेण्यात आले. यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ढोल – ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पाटस येथे शिवजयंती निमित्त गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेल्या सर्व शिवभक्तांना सरबत वाटप करण्यात आले.