दुर्मिळ कासवाची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : वनविभागाने पिंपरी मधील मैत्री चौक येथून दुर्मिळ कासवाची खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन व्यक्तींना कारवाई करत ताब्यात घेतले. अथर्व शशिकांत देशमुख व श्रीकृष्ण अवधूत वंजारी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे असून, त्यांना न्यायालयाने 3 जुलै पर्यंत वनकोठडीत पाठविले आहे.

विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना अवैधरित्या कासवाची विक्री होणार असून, कासवाची विक्री करणारा एक संशयित व्यक्ती मानकर चौक, वाकड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती ही त्या परिसरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याचे गुप्त बातमीदाराने सांगितले. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेषात त्याठिकाणी जाऊन सापळा रचला. काही वेळानंतर ती व्यक्ती दुचाकी वाहनावरून आली, मात्र लगेच परत फिरली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला. संयशित व्यक्ती पिंपरी येथील मैत्री चौक, तुकारामनगर येथील हॉटेलमध्ये दुसरा व्यक्ती येण्याची वाट पहात थांबली असता, दुसरा व्यक्ती आला व त्या दोघांमध्ये अवैधरित्या कासव खेरदी विक्रीचा व्यवहार चालू असताना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांनतर विभागाच्या महिला वनअधिकारी व इतर वनकर्मचारी यांनी आरोपींच्या राहत्या घराची झडती घेतली असता अथर्व देशमुख याच्या घरी एका छोटया बॉक्‍समध्ये दोन कासव मृत अवस्थेत व एक जिवंत आढळून आले. हे कासव इंडियन टेन्ट टर्टल आणि इंडियन रूफेड टर्टल या प्रजातीचे अनुसूची प्रकार-1 मधील संरक्षित कासव असून ते दुर्मिळ प्रकारातील आहे. त्यानुसार, आरोपीविरुद्ध अवैधरित्या कासव बाळगणे, विक्री करणे प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार, सचिन रघतवान, अतिक्रमण निर्मुलन व संरक्षण वनपरिक्षेत्र अधिकारी महेश मेरगेवाड, वनपाल वैभव बाबर, सुरेश बर्ले, वनरक्षक ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.