पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह त्याच्या आई व नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने याबाबत हरयाणा पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा पुणे पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला.
याप्रकरणी मेजर परिमलकुमार (रा. प्रिन्स ऑफ वेल्स रोड, वानवडी) यांच्यासह आई आणि एका नातेवाइकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी मूळची हरयाणातील आहे. तिने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. विवाहविषयक संकेतस्थळावरील माहिती वाचून मेजर परिमलकुमार यांच्या आईने तरुणीशी संपर्क साधला आणि विवाहाबाबत विचारणा केली. मुलगा परिमलकुमार लष्करात मेजर असून, पुण्यात नियुक्तीस असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर परिमलकुमार यांची आई आणि नातेवाईक हरयाणात मुलीच्या घरी गेले. तिच्या कुटुंबीयांशी विवाहाबाबत बोलणी केली. त्यानंतर तरुणी आणि परिमलकुमार यांच्यात संपर्क वाढला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा सध्या सुटी नसल्याचे त्यांनी तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणी पुण्यात आली. तेव्हा घरी नातेवाईक आले आहेत, असे सांगून तरुणीची लष्कर भागातील एका तारांकित हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली.
त्या वेळी परिमलकुमार यांनी तिच्यावर बळजबरी केली आणि आपण लवकरच विवाह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तरुणीला खंडाळा परिसरात फिरायला नेले. तेथेही तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा लवकरच दिल्लीत विवाह करू, अशी बतावणी केली. त्यानंतर परिमलकुमार, त्यांची आई, नातेवाइकांनी तरुणीशी संपर्क तोडला. तिने दूरध्वनी केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही.
तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी तिला धमकावले. आमची दिल्लीतील मोठ्या नेत्यांशी ओळख आहे. आमच्याविरुद्ध तक्रार केली, तर तुझे कुटुंबीय अडचणीत येतील, अशी धमकी दिली. तरुणीने नुकतीच हरयाणातील फरिदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित गुन्हा लष्कर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे तपास करत आहेत.