न्यूयॉर्क – इस्रायल-हमास युद्धाला विरोध करण्यासाठी पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत अनेक विद्यापिठांमध्ये आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी अनेक विद्यार्थी नेत्यांना अटक केली आहे. ज्यूविरोधी कारवायांमुळे डझनभर विद्यापिठांनी आणि महाविद्यालयांनी शैक्षणिक कामकाज बंद ठेवले आहे.
शिक्षण संस्थानी इस्रायलशी असलेले वित्तीय संबंध तोडून टाकावेत आणि संघर्षाला मदत करणाऱ्या कंपन्याची शिक्षण संस्थाना होणारी मदत नाकारावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते आहे. या आंदोलनामुळे इस्रायली विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी बोस्टन विद्यापीठातील आंदोलकांना पोलिसांनी हुसकावून बाहेर काढले. सुमारे १०२ जणांना अटक केली गेली. विद्यापीठातील प्राध्यापकांनाही निघून जाण्यास १५ मिनिटांची मुदत देण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठांच्या आवारातच तंबू ठोकून मुक्काम केला होता. त्यांनाही बाहेर काढण्यात आले.
विद्यापीठामध्ये संघर्ष होऊ नये, म्हणून मॅसेच्युसेटस विद्यापीठानेही काम बंद ठेवले आहे. इंडियाना विद्यापीठाचे अधिकारी आणि पोलिसांनी ब्लूमिंग्टन कॅम्पसमधून २३ जणांनना अटक केली. पेनसिल्वेनिया विद्यापीठ आणि पश्चिमेकडील फिलाडेल्फिया कॅम्पसचे कामकाज देखील बंद ठेवण्यात आले आहे.
कोलंबिया, साऊदर्न कॅलिफोर्नियामधील पदवी प्रदान समारंभ देखील रद्द केला गेल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी निषेध केला आहे. अरिझोना विद्यापीठाच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी मंच उभारला होता. त्या विद्यार्थ्यांना हटवून ६५ जणांना अटक केली गेली. इस्रायलशी संबंध तोडून टाकावेत या मागणीसाठी फ्री पॅलेस्टाईन संघटनेने पुढाकार घेतला आहे.