हडपसर (विवेकानंद काटमोरे) – पुणे महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांजरी बुद्रुक आणि शेवाळेवाडी ग्रामपंचायतचे दप्तर आज दुपारी महापालिकेने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आजपासून गावातील ग्रामपंचायतीचा गावगाडा कारभार संपुष्टात आला आहे.
बुधवारी सायंकाळी उर्वरित २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर आज ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, औताडेवाडी- हांडेवाडी व होळकरवाडी या गावांचे सर्व दप्तर आज ताब्यात घेतले.
सर्व प्रकारची कागदपत्रे, धनादेश, रोख रक्कम यावेळी ताब्यात घेण्यात आली आहे.सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कनिष्ठ अभियंता अभय शिंदे, आरोग्य निरीक्षक ईसाक शेख, वरिष्ठ लिपिक उमेश घुले, लिपिक टंकलेखक राजू पोपळघट यांनी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतले, तर शेवाळेवाडी ग्रामपंचायतीचे दप्तर कनिष्ठ अभियंता चिंतामणी दळवी, आरोग्य निरीक्षक राजेंद्र वायदंडे, वरिष्ठ लिपिक राजेंद्र बडदे, लिपिक टंकलेखक नवनाथ शेंडकर यांनी ताब्यात घेतले.
तसेच औताडे- हांडेवाडी ग्रामपंचायतीचे दप्तर कनिष्ठ अभियंता अन्वर मुल्ला, आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार, वरिष्ठ लिपिक पंडित शेळके, लिपिक टंकलेखक नवनाथ भानगिरे यांनी ताब्यात घेतले आहे. कनिष्ठ अभियंता शैलेश काथवटे, आरोग्य निरीक्षक वसंत ससाणे, वरिष्ठ लिपिक नितीन पिसाळ, लिपिक टंकलेखक विनोद आंबेकर यांनी ताब्यात घेतले आहे.
हे महापालिका कर्मचारी पाहणार कामकाज
यापुढे पुढील काही दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज हे त्याच ग्रामपंचायतींच्या कार्यालयातून सुरू राहणार आहे. सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी यासाठी गावानुसार नियंत्रक अधिकारी नेमले आहेत. उपअभियंता विक्रम लहाने यांच्या नियंत्रणाखाली मांजरी बुद्रुक आणि शेवाळेवाडीचे तर उपअभियंता संगीता पाटील यांच्या नियंत्रणाखाली औताडे- हांडेवाडी, होळकवाडीचे कामकाज सुरू राहणार आहे. याशिवाय या चारही गावांसाठी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घनवट हेही नियंत्रण अधिकारी असणार आहेत.
“महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या या चारही गावांचे सर्व कार्यालयीन कामकाजाशी निगडीत सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. येथील कामकाज पहाण्यासाठी नियंत्रक नेमले आहेत. तूर्तास ग्रामपंचायत कार्यालयातच नियमित कामकाज सुरू राहील. येथे जन्म- मृत्यू नोदणी सुरू राहील. लवकरच हे सर्व दप्तर ऑनलाईन केले की पुढील कामकाज सुरळीत सुरू राहील.” – प्रसाद काटकर (साहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय)