मुंबई – बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये एका डाॅक्टरचा देखील समावेश आहे. हे रॅकेट फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने चालवले जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आत्तापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचे तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह एकूण 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तीन जणांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना पवार, शितल वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय खंदारे यांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी या गँगच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त 9 महिने असे विक्री केलेल्या बाळांचे वय आहे.
पोलीस उपायुक्त रागासुधा आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बीएचएमएस डॉक्टरला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फर्टिलिटी फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये डॉ. संजय खंदारेचे दिव्यामध्ये दवाखाना आहे. मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथं त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे.
विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरीमध्ये देण्यात आले होते. तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती आणि त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करुन या बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.