Karachi TO Chennai – पाकिस्तानातील १९ वर्षाच्या मुलीला भारतात हृदय पर्त्यारोपण शस्त्रक्रीयेनंतर जीवदान मिळाले आहे. मानवतावादी मदतीसाठी राजकीय सीमा या अडथळा बनू शकत नाहीत, हे या उदाहरणामुळे पुन्हा एकदासिद्ध झाले आहे. पाकिस्तानातील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर भारताच्या मदतीने मात केली गेल्याचे देखील यामुळे सिद्ध झाले आहे.
आयेशा रेशान या कराचीतील १९ वर्षे वयाच्या मुलीवर चेन्नईतील एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात ही गुंतागुंतीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रीया करण्यात आली. हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेले हृदय भारतातील एका ब्रेन डेड झालेल्या डॉक्टरमुळे उपलब्ध होऊ शकले.
सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यावर ३१ जानेवारीला ही शस्त्रक्रीया झाली. शस्त्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर या मुलीचे नियमित व्यवहार सुरळीत सुरू झाले आणि तिला या महिन्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
हृदय प्रत्यारोपणासाठी या मुलीच्या पालकांनी सर्वात पहिल्यांदा २०१९ मध्ये या रुग्णालयाशी संपर्क साधला होता. त्यावेळी ती अवघ्या १४ वर्षांची होती. ती असाध्य हृदयरोगाने ग्रस्त होती. तिच्या हृदयाचे काम जेमतेम सुरू होते, असे इन्स्टिट्युट ऑफ हार्ट ऍन्ड लंग ट्रान्सप्लान्ट ऍन्ड मेकानिकल सपोर्टच्या कार्डियाक सायन्सेस डायरेक्टर आणि चेअरमन डॉ. के.आर. बालकृष्णन यांनी सांगितले.
या मुलीला एवढ्या लहान वयातच हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्या रक्ताभिसरणाचे काम सुरू ठेवण्यासाठी इसीएमओ मशिनची मदत घ्यावी लागली होती. त्यानंतर तिला कृत्रिम पंपाच्या आधारे रक्ताभिसरण करावे लागले. त्यानंतर तिची प्रकृती सुधारली आणि परत पाकिस्तानला परतली होती.
आणखीन दोन वर्षांनी तिच्या हृदयातील एक झडप काम करेनाशी झाल्यामुळे ती पुन्हा आजारी पडली. यामुळे तिच्या हृदयात जंतू संसर्ग देखील झाला. पाकिस्तानातच तिच्यावर उपचार करणे अशक्य झाले होते. तिला व्हिसा मिळणे खूप अवघड झाले होते, असे डॉ. बालकृष्णन म्हणाले.
या कन्येची आई एकल पालक आहे. त्यांच्याजवळ मनुष्यबळ आणि पैसा देखील नव्हता. वारंवार रुग्णालयात भरती करण्याच्या खर्चासह संपूर्ण उपचाराचा खर्च देखील रुग्णालयालाच करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. चेन्नईतील ऐश्वर्या ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने आणि प्रत्यारोपण करण्यासाठी आलेल्या रुग्णांनी गोळा केलेल्या वर्गणीतून आयेशावरील उपचार होऊ शकले. नवी दिल्लीतील ब्रेन डेड डॉक्टरमुळे तिला आवश्यक असलेले हृदय मिळू शकले.
रुग्णालय खासगी असल्यामुळे स्वयंसेवी संस्था आणि देणग्यांच्या बळावरच ही शस्त्रक्रीया होऊ शकली. जर ते सर्व केले नसते तर ही मुलगी जिवंतच राहू शकली नसती, असेही डॉ. बालकृष्णन यांनी सांगितले.
आयेशाला फॅशन डिजायनर व्हायचे आहे. उपचारांसाठी भारतात येण्यासाठी आवश्यक व्हिसा उपलब्ध करून दिल्याबद्दल तिने भारत सरकारचे आभार मानले आहेत. पाकिस्तानात एवढी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे तिच्या आईने सांगितले.
अवयव प्रत्यारोपणाविषयी पाकिस्तानात आवश्यक तेवढी जागृती झालेली नाही. ती व्हायला हवी, तरच रुग्णाना जीवनदान मिळू शकेल, असे लाहोरमधील पाकिस्तान किडनी आणि यकृत संस्था आणि संशोधन केंद्राचे डीन आणि सीईओ डॉ. दार यांनी सांगितले.
२०१४ मध्येही झाली होती अशीच शस्त्रक्रीया…
हृदय प्रत्यारोपणासारखी शस्त्रक्रीया करायला भारतात आलेली आयेशा ही पाकिस्तानातील पहिलीच रुग्ण नाही. २०१४ साली ३७ वर्षे याच्या मोहम्मद आमिर (बदललेले नाव) व्यक्तीवर देखील अशीच शस्त्रक्रीया केली गेली होती. त्यांच्याशिवाय गुजरातमधील इमाम कारी झुबेर हा हृदय प्रत्यारोपणासाठी चेन्नईला जाणारा पहिला पाकिस्तानी होता. दुर्दैवाने, त्लांना गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.