वालचंदनगर – गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची पूजा केली. स्वाभाविकच त्यांचे लक्ष माझ्या पादत्राणांकडे सारखे असते. माझे पादत्राणे घेऊनच ते चालत होते, मते मागत होते. त्यामुळेच माझ्या पादत्राणांची त्यांना जास्त काळजी वाटते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका करत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यानंतर खडसे यांच्यावर सोशल मीडियावर अनेक विनोद केले जात होते. गिरीश महाजन म्हणाले होते की, एकनाथ खडसे मंदिरात प्रसाद खाण्यासाठी गेले तर प्रसाद संपून जातो आणि बाहेर आल्यावर चप्पल चोरीला जाते. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीच्या रूपाने राष्ट्रवादीने पुनर्वसन केले. लगेचच महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी होऊन सत्तापरिवर्तन झाले. याच घडलेल्या राजकीय नाट्यावर एकनाथ खडसे यांची खिल्ली महाजन यांनी उडविली होती.
आज एकनाथ खडसे हे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी भरणे कुटुंबीयांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे एक जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी खडसे पती-पत्नी भरणेंच्या निवासस्थानी आले होते.