पती, सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल
आळंदी – आळंदी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांची सून तर पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेविका कमल घोलप यांच्या कन्येने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेआठ वाजण्याचा सुमारास आळंदी येथे घडली. याप्रकरणी पती, सासू, सासरे यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांका अभिषेक उमरगेकर-कांबळे (वय 29) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती अभिषेक अशोक उमरगेकर कांबळे, सासरे अशोक भगवान उमरगेकर कांबळे, सासू माजी नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर कांबळे (सर्व रा. आळंदी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल ऊर्फ बापू अभिमान घोलप (वय 45, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रियांका यांचा विवाह आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक सोबत 16 नोव्हेंबर 2021 रोजी झाला.
विवाहाच्या तीन महिन्यानंतर आरोपींनी प्रियांका यांच्या लग्नात हुंडा म्हणून देण्याचे राहिलेले फर्निचर व इतर संसारोपयोगी वास्तूसाठी तसेच घरातील इतर किरकोळ कारणावरून प्रियांका यांना शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला. अपमानास्पद वागणूक देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत आळंदी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर प्रियांका यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यावेळी उमरगेकर-कांबळे आणि घोलप या दोन्हीकडील नागरिकांनी वायसीएम परिसरात गर्दी केली. वायसीएम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तणाव कमी करण्यासाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.