Baramati Loksabha election 2024| लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील बारामती मतदार संघाचा देखील समावेश आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांच्या कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (महाविकास आघाडी) सुप्रिया सुळे निवडणुकीत रिंगणात आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (महायुती) सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांना बदलावे लागले मैदान Baramati Loksabha election 2024|
प्रत्येक निवडणुकीत बारामतीतील प्रचाराची सांगता शरद पवारांच्या सभेनं होत असते. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता ही मिशन हायस्कूल मैदानावरील सभेने होत असे. मात्र यंदा पहिल्यांदाच ही जागा अजित पवार यांनी मिळवली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांची सांगता सभा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षानांतर यंदा पहिल्यांदाच सभेसाठी हे मैदान शरद पवार यांना मिळाले नाही. त्यामुळे शरद पवारांची सभा मोरगाव रस्ता येथे लेंडी पट्टीच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे.
कुठे होणार सभा? Baramati Loksabha election 2024|
सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव हायस्कूल मैदानात शरद पवार यांची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर मोरगाव रस्ता येथे लेंडी पट्टीच्या क्रिकेट मैदानावर शरद पवारांची सांगता सभा पार पडेल. तसेच सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची बारामती शहरातून भव्य प्रचारफेरी निघणार आहे. त्यानुसार आता सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेसाठी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील मैदानावर होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर दुपारी तीन वाजता अजित पवार यांची सांगता सभा मिशन हायस्कूलचे मैदानावर होईल.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावतील. अधिकृत प्रचार संपल्यानंतर बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला, पुरंदर-हवेली, भोर-राजगड-मुळशी या सहा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचाराला जोर येणार आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची प्रचार सांगता सभा आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची सांगता सभा याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. नणंद -भावजय विरोधात होणाऱ्या या निवडणूक लढ्यात काका-पुतणे शेवटच्या क्षणी प्रचाराद्वारे काय बोलणार? आणि कोणकोणाला क्लिन बोल्ड करणार हे प्रचार सभा संपल्यानंतर स्पष्ट होईलच.
हेही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामललाचे घेणार दर्शन; अयोध्येत करणार रोड शो