हरिश्‍चंद्र गडावरील मंदिरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तींची चोरी

अकोले  -तालुक्‍यातील हरिश्‍चंद्र गडावरील विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तींची भर दिवसा चोरी करण्यात आली. याबाबत राजूर पोलीस व पुरातत्त्व खात्याकडे पाचनई ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच चोरीचा तपास तातडीने केला जावा, अशी मागणी वन विकास समितीचे अध्यक्ष चंदर भारमल व ग्रामस्थांनी केली आहे.

आठ दिवसांपूर्वी भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी गडावरील मुख्य मंदिराच्या शेजारी असलेल्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील दोन्ही मूर्ती चोरून नेल्या. सकाळी दहा वाजता कळसूबाई, हरिश्‍चंद्र गड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळ व वन समितीचे अध्यक्ष चंदर भारमल, गंगाराम घोगरे, कुंडलिक भारमल, माणिक खोडके, भास्कर बादड, किसन खोडके व गडावर टपऱ्या थाटलेल्या व्यावसायिकांची मंदिराच्या बाहेर बैठक सुरू होती. याच वेळी मंदिरातून भर दुपारी साडेबाराला या मूर्ती चोरीस गेल्या.
ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने चोरट्यांची शोधाशोध केली. मात्र मूर्ती सापडल्या नाहीत. त्यानंतर नगर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुरातन व दगडी नक्षीकाम केलेल्या या पुरातन मूर्ती होत्या. दर शिवरात्री व एकादशीला ग्रामस्थ येथे दर्शनासाठी येत असतात.

सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तपास सुरू केला आहे. पुरातत्त्व विभागाचे निरीक्षक पवार यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मुख्य मंदिर व मूर्तीची दुरावस्था झाली असून, पुरातत्त्व खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, मूर्ती चोरीबाबतही त्यांची उदासीनता दिसून येत आहे. चोरीचा तपास तत्काळ लागावा म्हणून ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले. मात्र आठ दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.