पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात गेल्या काही दिवसांपासून हवा प्रदूषण पुन्हा वाढले आहे. दुसऱ्या बाजूला शहरात मोठया प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. पालिकेने कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई वाढविण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस केल्या आहेत.
शहराच्या प्रदूषणाबाबत न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या दाव्यांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेची बैठक बोलाविली होती. या बैठकीत या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेकडून सर्व आरोग्य निरीक्षकांना याबाबत सूचना केल्या आहेत. कचरा जाळणाऱ्यांवर पुढील तीन महिन्यात मोठया प्रमाणात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, घाण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेने चार स्वतंत्र वाहने असलेली गस्ती पथके नेमण्यात आली होती. त्यांच्याकडून कारवाई केली जात होती. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी ही चारही वाहने, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाची इतर वाहनेही काढून घेण्यात आली आहे. परिणामी, कारवाई पथकाचे कामकाज ठप्पच आहे.