वाई, (प्रतिनिधी) – एका दुचाकी चोरटयास अटक करत वाई पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोन्या उर्फ प्रीतम सुनील शिंदे (रा. गंगापुरी, वाई) असे याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना वाहन चोरीतील एक संशयित वाईतील बावधन नाक्यावर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तपास पथकाला त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने बावधन नाक्यावर सापळा रचून दुचाकी क्रमांक एम. एच. 11 सी. वाय 7827 वरुन आलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ताब्यातील दुचाकी वाई मंडई परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशी करताना त्याने सातारा जिल्हा रुग्णालय परिसरातून एम.एच. 11 बीजे 0610 ही चोरी केली असल्याचेही सांगितले.
तपास पथकाने त्याच्याकडून चोरीतील दुचाकी हस्तगत केल्या असून या कारवाईत पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण,
सुधीर वाळुंज पो.ना राहुल भोईर पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, धिरज नेवसे, विशाल शिंदे यांनी सहभाग घेतला. याबद्दल पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अभिनंदन केले.