पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “पुढील आठवड्यात पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची होणारी सभा ही विक्रमी असेल,’ असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केला.
येत्या २९ एप्रिल रोजी पुण्यात रेसकोर्स येथील मैदानावर ही सभा होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात संयुक्त बैठक घेतली. यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सभेचे मुख्य संयोजक तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “पुण्यात रेसकोर्स मैदानावर ही सभा होईल. त्यासाठी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी चारही पक्षांच्या महायुतीच्या आमदार, तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आले असून यात सभेचे नियोजन करण्यात आले आहे .
तर, याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी कराड येथे सभा असून, या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या समवेत असतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा पुण्यातील राजभवन येथे मुक्काम असेल. मात्र, या सभेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार नसले, तरी अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
सभेत दोन लाख नागरीक उपस्थित राहतील, या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी उन्हाळा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी, मांडव तसेच स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. तसेच शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग तसेच इतर आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. – राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप